अमिताभ- रेखा आणि....

अमिताभ- रेखा आणि....

    अमिताभचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला अन् पुरे न्यूज चेनल्सपे 'बीग बी' छा गया.योगायोगानं त्याच दिवशी रेखाचा गार्डही पॉझिटीव्ह आल्याने तिचा बंगलाही 'सील' झाला.एका प्रसिध्द वर्तमानपत्रात तर हेडलाईनच होती, "अमिताभ कोरोना पॉझिटीव्ह; रेखाचा बंगला सील" मग काय... सोशल मीडियावर उधाण आलं. पुन्हा एकदा अमिताभ-रेखा संबंध चर्चिले जाऊ लागले. पडदा पडलेल्या भूतकाळातील प्रकरणावरील पडदा हलकेच दूर झाला.

    हिंदी चित्रपटस्रुष्टीतील महानायक, शहंशाह अमिताभ बच्चन आणि रुपगर्विता, सशक्त अभिनेत्री रेखा यांचे एका चित्रपटाच्या शुटींग दरम्यान सूर जुळले. ते ८० चं दशक. अमिताभ सुपरस्टार झालेला. एकामागून एक त्याचे चित्रपट हिट होत असलेले. लार्जर दँन लाईफ त्याची प्रतिमा चित्रपटग्रुहाचे पडदे व्यापून उरलेली. एक उंच 'लंबू' हिरो. तो पोलीस ऑफीसर असो, स्मग्लर असो, कुली असो वा सौदागरचा खेड्यातला मोती गुडवाला. प्रत्येक भूमिका त्यानं लिलया पेलली. अनेकानेक भूमिका अजरामर करण्याचे ते मंतरलेले दिवस.आणि रेखाही तिच्या अभिनयामुळे, सौंदर्यामुळे हिट झालेली. अमिताभ-रेखाच्या प्रेमप्रकरणाची चर्चा सगळीकडे पसरलेली. 'मिस्टर नटवरलाल' मध्ये जेव्हा रेखानं गाण्यात "परदेसिया ये सच है पिया, सब कहते है मैने तुझको दिल दे दिया"   म्हटलं तर ते समस्त अमिताभ आणि रेखाच्या चाहत्यांना पटलं. कारण अमिताभला परफेक्ट साजेशी नायिका त्याला भेटली होती. वास्तविक जीवनात अमिताभ विवाहीत होता. पण जया त्याच्या पासंगातही नाही वाटायची. ना उंची, ना दिसण्यात, ना अभिनयात. तशी अभिनयासाठी जयाला मानणाऱ्यांची संख्या आहे, पण ती अगदीच कमी.

    अमिताभ-रेखा प्रकरणाचे किस्से 'सातवे ऑंंसमान' तक पहूँचे थे. काय होणार? सोडेल का अमिताभ जयाला? करणार का रेखाशी लग्न? पण संसार वाचवण्यासाठी जयाने नक्कीच एखाद्या देवाला साकडं घातलं असणार. कारण तो कुलीचा सुप्रसिध्द की कुप्रसिध्द अपघात झाला. अमिताभची प्रक्रुती गंभीर झाली. तो जीवन-मरणाच्या हिंदोळ्यावर झुलला काही दिवस. या आजारपणात जयाने त्याची मनोभावे सेवा केली. परिस्थिती तिच्या हातात आली होती. म्हणतात दवाखान्यात रेखा त्याला भेटायला यायची. ही तिला त्याला भेटूच देत नसे. पत्नी म्हणून तिला तेवढा अधिकार होताच. अमिताभ बरा झाला. रेखा त्याला भेटली नसल्याने तिच्याबद्दल त्याचे काही गैरसमज झाले असतील वा जयाने समर्पणभावाने अहोरात्र केलेली त्याची सेवा असेल. अमित-रेखाच्या प्रेमाला ब्रेक लागला. एक प्रेमकहाणी अर्धवट, अधुरी राहिली. मुळातच सुसंस्क्रुत असलेल्या अमिताभने पत्नी आणि मुलांवर अन्याय होऊ नये म्हणून हे पाऊल उचललं असेल वा काही जाणकारांच्या तथाकथित म्हणण्यानुसार रेखाच्या कुंडलीत पतिसुख नसल्याने, अमिताभच्या जिवाला धोका होऊ नये म्हणून ती स्वतःच त्याच्यापासून दूर गेली. कारणं काही का असेनात, ती त्या दोघांनाच माहित. पण ते दोघं दूर झाले.

    हिंदी चित्रपट स्रुष्टीतील ही काही पहिलीच प्रेमकहाणी नव्हती. राज कपूर-नर्गिस प्रेमप्रकरणाचा पण खूप गवगवा झालेला. कालांतराने तेही प्रेमप्रकरण संपलं. इथे राज कपूरही विवाहीत होता. पण त्याची फारशी कोणाला चुटपुट लागली नाही. देवानंद-सुरैया, दिलीपकुमार-मधूबाला असो वा गुरुदत्त-वहिदा रहमान. आपली चित्रपटस्रुष्टी तर साक्षात मायानगरी आहे. इथे जोड्या जमणे आणि तुटणे अव्याहतपणे चालूच असते. काहीच भाग्यवान जोड्या लग्न करुन आयुष्यभर एकमेकांच्या होतात. क्वचितच कोणती प्रेमकहाणी तुटल्याबद्दल कोणाला खूप दुःख झालं असेल. पण आजही अमिताभ आणि रेखा हे समीकरणच वेगळं आहे. सिने इंडस्ट्रीतील कोणतेही कार्यक्रम असो वा अवॉर्ड फँशन, अमिताभ स्टेजवर असेल तर कँमेरा रेखावर फिरतो. वा रेखाचा काही परफॉर्मंस असेल तर प्रेक्षक अमिताभच्या चेहऱ्यावरचे भाव टिपून घेण्यासाठी अधीर असतात.

    आजही सिनेशौकीनांच्या मनात अमित-रेखा एकत्र नसल्याची रुखरुख कायम असावी. खऱ्याखुऱ्या आयुष्यातही एकमेकांना अनुरुप जोडी बनता बनता राहून गेली असंच चाहत्यांना वाटत असावं. म्हणून अमिताभ कोरोनाग्रस्त असतांना विनाकारणच रेखा चर्चेत येते. उगीचच लोकांना तिचं नाव त्याच्याशी जोडावंसं वाटते. एक अमिताभचा कट्टर चाहता मला काल म्हणाला, "अमिताभला होण्याऐवजी जयालाच कोरोना होऊन ती मरायला पाहिजे होती. म्हणजे अमिताभला म्हातारपणी तरी रेखाशी लग्न करता आलं असतं."
आपल्या म्हणण्या न म्हणण्याने वा आपल्या इच्छा, अपेक्षांनी थोडंच घडत असतं. जे घडायचं तेच घडत असतं. असं म्हणतात, देव प्रत्येकालाच खूप काही देत असतो. पण पूर्णत्व कोणालाच प्रदान करत नाही. स्वतः देव असूनही क्रिष्ण आयुष्यभर राधेच्या विरहात तडफडलाच ना? 

    कोणालाही हेवा वाटावा असं सर्व सुख अमिताभला पण लाभलं. प्रचंड पैसा, अमाप लोकप्रियता, वेड्या चाहत्यांचं अलोट प्रेम, मानसन्मान, पुरस्कार....काय काय नाही मिळालं त्याला? पण या सर्व प्रकाशझोतात त्याच्या मनाचा एक कोपरा कायम अंधारलेला राहिला असावा. कहाणी सुफळ, संपूर्ण झाली म्हणतात. पण अमिताभची कहाणी सुफळ, संपूर्ण झाली असती तर लोकांना रेखाचं नाव वारंवार आठवलं असतं का? रेखाचा पती उद्योगपती मुकेश अग्रवाल गेल्यावरही तिचं ते मांग भरणं...सारं अतर्क्य आहे. तीही भूतलावरील शापित अप्सराच आहे. अमिताभच्या उल्लेखाशिवाय तिच्याही स्टोरीला पूर्णत्व नाही...अपूर्णतेचा शाप प्रत्येकाच्याच जीवनात असतो. ती अपूर्णता वेगवेगळ्या प्रकारची असते. कधी एखादा खूप हूशार, काबील असूनही त्याचे जगण्याचे, खाण्यापिण्याचे वांधे होतात. कुठे एखाद्या गर्भश्रीमंताला मूलबाळ नसते. तर सर्वगुणसंपन्न, शक्तिमान बाहूबलीला राजसिंहासन न मिळता कारस्थानी भल्लालला मिळते. कित्येकांचे ध्येय अपूर्ण राहतात, इच्छा फळत नाहीत त्या मनातच मरुन जातात. शेवटी अपूर्णता असतेच कुठेतरी...

    अपूर्णता आहे म्हणूनच पूर्णत्व प्राप्त करण्याची धडपड आहे. जगण्याची असोशी आहे. सगळयांनाच सगळं भेटलं असतं तर जगण्यात मजा नसती राहिली. माणसाचे पाय जमिनीवर राहिले नसते. अपूर्णता आहे म्हणून मिळालेल्या सुखाची किंमत आहे. नाही का? तुम्हाला काय वाटतं?

*भावना प्रदीप पवार

Comments

Popular posts from this blog

शुभ-अशुभ

गुरुजी

नववा "ब"