गुरुजी
गुरुजी
* भावना पवार
जेवण आटोपून गुरुजी हात पुसत नाही तोच मधूचा फोन आला. "गुरुजी लवकर या शाळजवळ. लयच तमाशा झाला आहे. परस्थिती लयच हाताभायीर चाल्ली आहे. तुमच्याशिवाय ज्यमत नाही आता. या लवकर." "अरे कपडे घालून निंघूनच रायलो. पन झालं काय?" " तुम्ही या तं हितं. बराबर मालूम पडते तुम्हाले." मधूनं घाईनं फोन कट केला. गुरुजींनी लगेच कपडे घातले. गुरुजी जायला निघाले. गुरुजी म्हटल्याबरोबर आपल्या डोळ्यासमोर येतात ते धोतर सदरा घातलेले, वयस्कर ग्रुहस्थ. पण इथे गुरुजी म्हणजे पँट शर्ट घालणारे, बाईकवरुन फिरणारे चाळीशीतले शिक्षक. सारा गावच प्रेमाने त्यांना गुरुजी म्हणायचा. कोण्या गरिबाला पैशाची मदत कर, कोणाला तालुक्याला नाही तं जिल्ह्याला दवाखान्यात नेऊन भरती कर, अडल्या नडल्यांचे कामं करुन देणे वगैरे. गावात किहीही भांडणतंटा झाला तरी लोकांना रात्री-बेरात्री गुरुजी आठवत.गुरुजी भांडण मिटवत. विधायक कामासाठी ते सर्वात पुढे असत.
गुरुजी एका जवळच्या गावात दोन शिक्षकी शाळेवर शिक्षक होते. पाच वर्षांपूर्वी त्या गावात बदली होऊन आले होते. आधी ते ज्या गावात होते तेे गावही मोठं होतं, शाळा ही मोठी होती. या गावात गुरुजी पहिल्या दिवशी शाळेत रुजू व्हायला आले. छोटीशी शाळा, तिचा रंग उडालेला. कुठले कुठले कौलं फुटलेले.मंडाल्यांना भेगा गेलेल्या. वर्गखोल्यांच्या बाजूला गवत वाढलेलं. कंपाउंड वॉल ही काळपट झालेली. शाळेची पूर्ण रया गेलेली. उदास वास्तू. गुरुजीच्या स्वागताला एक शिक्षक उभे होतेे अन् एक चपराशी. त्यांनी चौकशी केली शाळेत पहिली ते चौथी मिळून एकूण दहा विद्यार्थी. त्यातले 3-4 च येणारे." एवढेच विद्यार्थी असतात का सर? बाकीचे कुठाय?" डावा डोळा मिचकावत सर बोलले, "एवढेच असतात गावातले. बाकीचे येतातच कुठं? पारध्यांची पोरं. आराम आहे इथं. विद्यार्थीसंख्या नसल्याने काही कटकटच नाही." पाच-सात दिवस गुरुजी बघत होते, आहे तेवढ्या मुलांना शिकवत होते. शाळेची दयनीय अवस्था त्यांना बघवत नव्हती.
सातव्या दिवशी गुरुजी शाळेत आले तेव्हा त्यांच्या हातात मोठी पिशवी होती. त्यात बिस्कीटचे पुडे, चॉकलेट्स, गोळ्या होत्या. गुरुजींनी सहकारी सरांना आणि शाळेतल्या मुलांना सोबत घेतलं. "सर, चला आपण पारध्यांच्या घरी आणि पालावर जाऊ." दोन शिक्षक आणि चार विद्यार्थी पाहून पारधी वस्तीतले बाया-माणसं त्यांच्याभोवती जमा झाले. पटावर असलेली पोरं हळूच जाऊन लपली. गुरुजींनी सर्व लहान मुलांना, त्यांच्या आई-वडिलांना बिस्कीटचे पुडे, चॉकलेट वाटले. जरासा कल्ला कमी झाल्यावर सगळ्यांना खाली बसवून गुरुजींनी मी तुमच्या पोरांना शाळेत न्यायला आलो आहे हे सांगितल. बिन नाव घातलेलीही बरीच पोरे होती. त्यांनी शिक्षणाचे महत्व पटवून सांगितलं. सर्वांना घेऊन या म्हणाले. सर्वांना रोज खाऊ मिळत जाईल वगैरे बोलले. गुरुजींच्या तळमळीने बोलण्याचा बराच परिणाम झाला.
खाऊच्या लालसेनं दुसऱ्या दिवशी बरीच मुलं शाळेत आली. पारध्यांची मुले ती. अंगाला पाण्याचा पत्ता नाही. पायावर ओघळ उमटलेले. कळकट्ट, कुठे कुठे फाटके कपडे. डोक्याला तेल नाही, अंगाचा वास इतका की गुरुजींनी नकळत नाकाला रुमाल लावला. बिस्कीट, चॉकलेट खाऊन जरा वेळ बसून मुलं पांगली. नंतरच्या दिवशी गुरुजींच्या गाडीवर स्वतःच्या पैशांनी घेतलेल्या दोन प्लास्टिकच्या नव्या बकेटा, मग्गे, साबणाचे डब्बे, त्यात सुगंधी साबणा, एक मोठा आरसा, तेल, पावडर, कंगवे, नविन युनिफॉर्म, नवीन दप्तर काय न काय... मुलं शाळेत आली. गुरुजींनी शर्ट काढून ठेवला. पॅन्ट वर खोचला. चपराश्याला पाणी आणायला लावलं. बाहेर गोट्यावर बसून एकेका पोराची साबण लावून खसखसून आंघोळ घातली. नवेकोरे युनिफॉर्म घालायला दिले. मुलांना त्यांच्या कपड्यांना साबण लावून ते धुवून वाळवायला सांगितलं. आरशात पाहून तेल, पावडर लावताना पोरं स्वतःचं नवं रुप पाहून हरखली.घरी गेल्यावर पोरांना पाहून माय बापही हरकले.काही दिवसांनी मुले स्वतः स्वच्छ, नीटनेटके राहायला लागली. शाळा नियमित सुरू झाली. पटसंख्या ही वाढली. पावडर, रेडिओ, राष्ट्रपती, हिरोहोंडा, फटफटी, नेलपालीस, पॉँड्स, सुरैया अशी नावं असलेली ही पारध्याची पोरं. चोर गुन्हेगारी जमाती चा शिक्का माथ्यावर लागलेली ही #पारधी जात. घरी शेतीवाडी नाही. उद्योगधंदा नाही. उत्पन्नाचे कोणतेही साधन नाही. शिक्षण तर अजिबातच नाही. त्यामुळे नोकरी नाही. पोटाची आग विझवायला मग हे लोक उचलेगिरी करायला लागले गावात किंवा कोणाच्या शेतात चोरी झाली की पोलीस येणार आणि न विचारता यांना उचलून नेणार. जिथे उद्याच्या खाण्याची सोय नाही तिथं कुठं भविष्याचे स्वप्न नं बिप्न. पण गुरुजींनी पोरां सोबतच त्यांच्या माय बापाशी सतत संवाद साधत त्यांच्या मनात आशेच्या बिया हळूच पेरल्या.
गुरुजींनी मिस्त्री बोलावून मुंडाल्या दुरुस्त केल्या. शाळेची रंगरंगोटी केली. गवत कापून घेतलं. हळूहळू कंपाउंड वॉल वर सर्व शिक्षा अभियानाचे मुलगा आणि मुलगी पेन्सिलवर बसलेले रंगवले गेले. दोन्ही शिक्षक जीव तोडून शिकवत होते. मुलं मनापासून शिकत होती. चांगले मार्क्स मिळवत होती. त्यांच्या मायबापाच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मुलांचे डोळे नव्या स्वप्नांनी चमकत होते.
आणि अशातच गुरुजींची बदली झाली दुसऱ्या गावाला. वस्तीत बातमी समजली. पारधी बायामाणसांना धक्काच बसला. "गुर्जी चाल्ला गुर्जी चाल्ला" चा कल्ला झाला. सारी मंडळी बायकापोरांसहित शाळेसमोरच्या रस्त्यावर जमली. बाया रडू लागल्या. बाप्पे जरा गपगुमान होते. तेवढ्यात गावचे सरपंच तिथे आले. त्यांना पाहून एका बाईने शिव्या द्यायला सुरुवात केली. " कोन व्हय रे तो गध्याच्या पोटचा? माह्या गुर्जीची बदली केली. आना त्याले समोर. त्याले चपलाईनं मारतो". आणि ऐकू नये अश्या शिव्या. तिचं पाहून आणखी बाया जोरजोरानं बोलायला लागल्या. "आमचे लेकरं आता कशे शिकतीन बाप्पा" म्हणून रडायला लागल्या. हा सारा गोंधळ रस्त्यावर. येणा- जाणाऱ्या गाड्या जाऊ द्यायलाही त्या तयार नव्हत्या. म्हणून मधूचा, चपराश्याचा गुरुजींना फोन आलेला.
गुरुजीला पाहताच भावनांचा कल्लोळ उमटला. आवेग ओसरल्यावर गुरुजींनी सर्वांना शांत केलं. बदली होतच असते असं सांगितलं. बदली झाली की जावंच लागते हे समजावून सांगितलं. "आता तुमचे पोरं शाळेत येतात, मन लावून अभ्यास करतात. त्यांना अभ्यासाची सवय लागली आहे. आता कोणताही मास्तर आला तरी ते चांगले शिकतीन. मी अधून मधून येत जाईन. तुम्ही मला केव्हाही बोलवा." गुरुजी बोलत होते आणि एरव्ही जोरजोराने बोलणाऱ्या,जोरजोराने रडणाऱ्या डोळ्यांना मुकाट धारा लागल्या होत्या...
Apratim...👌👍
ReplyDeleteओघवत्या भाषेत चांगली कथा रंगवलीय
ReplyDeleteKhup sundar katha 👌🏻👌🏻👍🏻
ReplyDeleteChan lihilay Madam
सुंदर लेखन डोळ्यासमोर चित्र उभ राहील , अप्रतिम व एक बोधदायी लेख .
ReplyDeleteसर्वांना मनःपूर्वक धन्यवाद..
ReplyDeleteATISHAY CHHAN..
ReplyDelete