गुरुजी
गुरुजी * भावना पवार जेवण आटोपून गुरुजी हात पुसत नाही तोच मधूचा फोन आला. "गुरुजी लवकर या शाळजवळ. लयच तमाशा झाला आहे. परस्थिती लयच हाताभायीर चाल्ली आहे. तुमच्याशिवाय ज्यमत नाही आता. या लवकर." "अरे कपडे घालून निंघूनच रायलो. पन झालं काय?" " तुम्ही या तं हितं. बराबर मालूम पडते तुम्हाले." मधूनं घाईनं फोन कट केला. गुरुजींनी लगेच कपडे घातले. गुरुजी जायला निघाले. गुरुजी म्हटल्याबरोबर आपल्या डोळ्यासमोर येतात ते धोतर सदरा घातलेले, वयस्कर ग्रुहस्थ. पण इथे गुरुजी म्हणजे पँट शर्ट घालणारे, बाईकवरुन फिरणारे चाळीशीतले शिक्षक. सारा गावच प्रेमाने त्यांना गुरुजी म्हणायचा. कोण्या गरिबाला पैशाची मदत कर, कोणाला तालुक्याला नाही तं जिल्ह्याला दवाखान्यात नेऊन भरती कर, अडल्या नडल्यांचे कामं करुन देणे वगैरे. गावात किहीही भांडणतंटा झाला तरी लोकांना रात्री-बेरात्री गुरुजी आठवत.गुरुजी भांडण मिटवत. विधायक कामासाठी ते सर्वात पुढे असत. गुरुजी एका जवळच्या गावात दोन शिक्षकी शाळेवर शिक्षक होते. पाच वर्षांपूर्वी त्या गावात बदली होऊन आले होते. आधी ते ज्या गावात होते तेे गावही मोठं होतं, ...