नववा "ब"

नववा "ब"

     जसा सगळीकडे असतो नववा "ब" तसाच हाही नववा "ब"  वर्ग आहे. आपण लहानपणी म्हणायचो, 'अ' वर्गातले अभ्यासू, 'ब' वर्गातले बदमाश. तसाच हा 'ब' वर्ग आहे. हा एका चांगल्या शाळेतला मराठी मेडीयमचा वर्ग आहे. सारे हूशार, अभ्यासू पोरं नवव्या 'अ' मध्ये आहेत आणि उरले-सुरले, अभ्यास न करणारे, अभ्यासाचा कंटाळा करणारे, अभ्यास न जमणारे आणि खोड्या करणारे मुलं या वर्गात आहेत.
    आधी या वर्गाचा मॉनिटर होता प्रतिक. वर्गातले पोरं त्याला 'पत्या'  म्हणायचे. उंचपुरा धडधाकट मुलगा. सातवीच्या मानाने चांगला उंच. कपाळावर रोज चंद्रकोर लावणारा. शाळेच्या शिस्तीत बसत नसूनही चंद्रकोर लावण्यामुळे बऱ्याच वेळा मार खाणारा. पण शिवाजी महाराजांचा सच्चा मावळा. सातवीतच त्याने वर्गातल्या मुलांची खास शिवाजी महाराजांची म्हणून एक टीम तयार केली. त्या पोरांनी पैसे जमवून महाराजांचा मोठ्ठा फोटो आणून वर्गात लावला. त्याची पुजा करणे, हार घालणे या जबाबदाऱ्यापण पोरांना त्याने वाटून दिल्या. शिवरायांचं इतकं स्पिरीट की, प्रार्थना झाल्यावर 'भारत माता की जय' या घोषणा झाल्या की पत्या ओरडणार 'शिवाजी महाराज की...'  'जय' पत्याची टीम जोरात म्हणणार. वर्गातल्या त्या छोट्या मुलांमध्ये या छोट्या मुलाने 'शिवभक्ती' रुजवली. काही कारणास्तव तो शाळा सोडून गेला. आजही वर्गातली पोरं 'पत्याबॉस'ला 'मिस' करतात.

    वर्गातला दुसरा उपद्व्यापी मुलगा 'यश'. याचे वडील शहरातले कुख्यात गुंड. दोन-तीन मर्डर केलेले, आणि याच कारणातून यशच्या वडिलांची भर बाजारात गुंडांनी हत्या केली.जेव्हा वडिलांवर तलवारीने घाव घातले तेव्हा यश वडिलांसोबतच होता. बापाला गुंडांनी मारतांना त्याने प्रत्यक्ष पाहिले. यशच्या वर्गात चाळीस मुलं मुली. बातमी सगळ्यांना कळली तेव्हा यशच्या मनावर काय परिणाम झाला असेल म्हणून सर्व वर्ग चूप झाला होता.
"यश आता त्याच्या बाबांसारखा गुंडा बनेल का ग आई? तो त्याच्या बाबांच्या खुनाचा बदला घेईल का?"
वर्गातल्या शांत, सज्जन मुलांना प्रश्न पडलेला. कारण यशही शाळेत मारापिटी करतो, घाण शिव्या देतो. नुस्त मस्तीत त्याचं लक्ष असतं.पेपरमध्ये त्याला खूप कमी मार्क्स भेटतात कारण त्याचं लक्षच नसतं अभ्यासाकडे.

    काही दिवसांनी वर्गात यशच आणि रोहितचं जोरदार भांडण झालं.
"तू बाहेर भेट साल्या, तुले पाहून घेतो." यश रागारागाने बेभान होऊन रोहितवर ओरडला. पण रोहितनं तेवढ्याच शांतपणे "बाहेर पाहून घेतो, बाहेर पाहून घेतो काय लावलं बे. निव्वळ मारापिट्या. त्यापेक्षा हिम्मत असन, धमक असन तुह्यात तर अभ्यास करून दाखव.मायापेक्षा एक जरी मार्क जास्त भेटला तर तू बॉस अन् मी तुहा चेला. आहे काय कबूल?" यश तंतरला. आव्हानाला प्रतिआव्हान वेगळंच भेटलं होतं. तो तिरीमीरीतच बोलला. "आहे कबूल. करुनच दाखवतो तुले अभ्यास. घेऊन दाखवतो तुह्यापेक्षा जास्त मार्क."

    आणि खरंच फरक पडला. वर्ग आता शांत असतो. वर्गातला सगळ्यात मस्तीखोर मुलगा आता अभ्यासाला लागलाय. वेळ मिळेल तेव्हा तो वाचत असतो. लिहीत असतो. त्याला रोहितला हारवायचं आहे...पण चांगल्या पद्धतीने. मारामारी करुन नाही तर अभ्यासातून. कदाचित असंही होईल यातून यशला अभ्यासाची गोडी लागेल. तो खूप शिकेल आणि गुंडागर्दी त्याच्या डोक्यातून नाहीशी होईल. त्याच्या मित्रांना तेच हवं आहे. पण कौतूक असं वाटतं की नववीतल्या रोहितच्या डोक्यात इतका विधायक, सकारात्मक विचार कसा काय आला? आणि ती सकारात्मकता यशने अलगद झेलून घेतली. त्या सकारात्मकतेतूनच तो अभ्यासाला लागलाय. नुस्तं हुंदडणारा हा साधारण मुलांचा, साधारण परिस्थितीतला मुलांचा वर्ग. यशचं पाहून बाकीही पोरांना अभ्यास करावासा वाटतोय. 
नववा "ब" हळूहळू बदलतोय...

*भावना पवार, यवतमाळ

Comments

  1. Khup sundar mam!! Jai Bhawani, Jay Shivaji!

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

शुभ-अशुभ

गुरुजी