शुभ-अशुभ

शुभ-अशुभ

बाबांना जाऊन दोन महिने झाले होते. आईला भेटायला म्हणून ती पुन्हा माहेरी गेली परिवारासह.बाबांच्या जाण्याचं दुःख ताजंच होतं. आईच्या मनात ते भळभळत होतं. शनिवार,रविवार राहून ती सोमवारी परत यायसाठी निघाली. तिथून निघवेना तरी निघाली. सामान गाडीत ठेवणं चालू होतं. बस्स् आता आईच्या पाया लागून निघायचं. सगळे नमस्कार करायला लागले तशी आई सरावाने देवघरात गेली आणि तिथून हळदी-कुंकवाचा करंडा घेऊन आली. कोणतीही स्त्री गावाला निघाली की तिला हळदी-कुंकू लावायची पध्दत.

ती चालली म्हणून आई नकळत पटकन करंडा घेऊन आली.आणि थबकली. काही क्षण असेच गेले. अत्यंत उदास चेहऱ्याने आईने करंड्याचा हात तिच्यापुढे धरला आणि कसं बसं बोलली,"तुझ्या हातानं लावून घे कुंकू."
आईच्या डोळ्यात पाणी तरळलं.तिलाही रडायला आलं. स्वतःला लगेच कंट्रोल करत ती बोलली, "का गं? मी का लावून घेऊ? तू लाव." डोळे पुसत आई म्हणाली, "आता मला तुला कुंकू लावता येणार नाही. मी अशी..." विधवा शब्द बोलणं आईला जड गेलं. "मला चालत नाही तुला कुंकू लावायला. मी कुंकू लावलं आणि काही अशुभ घडलं तर? म्हणून माझ्यासारख्यांनी सवाष्णींना कुंकू लावू नये."
"आई, हे तू बोलतेस? बाबा असेपर्यंत तू शुभ होती आणि आताच कशी अशुभ झाली? तू माझी आई आहेस. तू माझं कधीच अशुभ, अमंगल चिंतणार नाही. मग माझं अशुभ होईलंच कसं? आणि जे व्हायचं ते माझ्या नशीबाने होईल. माझंच काय तुझ्या सुनांचं आणि कोणाचंही तू वाईट चिंतणार नाही. मग वाईट घडेलच कसं?" ती बोलली.

तरीही आईचा जीव होत नव्हता, तिला कुंकू लावायला..
"कुंकू तर मला तूच लावशील. काहीही अशुभ, वाईट-साईट घडणार नाही. लाव पटकन."
आईने तिला कुंकू लावलं. आईचे डोळे आणि मन दोन्ही भरुन आले. आईनं तिला मिठी मारली. दोघींचेही डोळे झरत राहिले..

आता प्रत्येक वेळी आईच तिला कुंकू लावते. चार वर्षात तिचं काहीही अशुभ, वाईट झालेलं नाही. मी ओळखते नं तिला..

*भावना पवार, यवतमाळ

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

गुरुजी

नववा "ब"