बदल

बदल

मी एका सांजीच्या म्हणजे सातव्या महिन्याच्या कार्यक्रमाला गेले होते. सजावट वगैरे छानच होती.सगळ्या बायका जमल्या.डोहाळे जेवणाच्या गाण्यांना सुरुवात झाली.दोघी-तिघींनी मिळून पाच गाणे म्हटले.मी कवयित्री.त्यामुळे गाण्यांच्या शब्दांकडे माझं जास्त लक्ष असतं.गाणी कान देऊन ऐकली.पाचही गाण्यात "तुझ्या पोटी राम जन्मणार आहे" "क्रुष्ण पाहुणा म्हणून येणार गं" पासून तर "सख्यांनो,एक गुपीत सांगते आज
ती चालली माहेरी एकटी पण तिकडून आणणार युवराज" वगैरे वगैरे.

अरे हे काय? एकाही गाण्यात राधा,सीता, राणी किंवा राजकुमारी नाही.सगळे पुरुष.देव असले तरी पुरुष.मी या विचारातून सावरत नाही तोच दुसरा विधी संपन्न झाला.ताटात वाट्यांमध्ये विविध गोड पदार्थ झाकून म्हणा किंवा लपवून ठेवले होते. कोणत्याही एका वाटीवरची पापडी त्या हिरवाकंच श्रुंगार ल्यालेल्या त्या भावी मातेला काढायची होती.ती जो पदार्थ काढेल त्यावरुन तिला मुलगा होणार की मुलगी हे ठरणार होतं.
तिने 'बर्फी' काढली.लगेच जमलेल्या तिच्या आई,सासवांसहित काही बायकांनी 'च्च' आवाज केला.म्हणजे तिच्याकडून काहीतरी घोडचूक झाली.काही सेकंद शांतता पसरली.'बर्फी' म्हणजे मुलगी होणार.सगळ्यांनी मनात म्हटलं, "नको नको मुलगी नको व्हायला".जरा वयस्कर तिची मोठी काकू बोलली, "पुन्हा काढ, दुसरी वाटी उघड." दुसऱ्यांदा खव्याची जिलेबी निघाली. पुन्हा शांतता.जणू काही मुलगीच होणार यावर शंभर टक्के शिक्कामोर्तब झालेलं..
दुसऱ्या एका पाळण्याच्या कार्यक्रमात त्या घरच्या सुनेने पहिल्यांदाच पेढ्याची वाटी उघडली.इतका सगळ्यांना आनंद झाला की जणू काही नुकताच मुलगा जन्मला.काही दिवसांनी तिला मुलगी झाली हा भाग वेगळा..
जिची सांजी होती ती एक स्त्री होती.कार्यक्रमाची नेटकी, हौशीने तयारी करणाऱ्या तिच्या जवळच्या आप्त सर्व स्त्रियाच होत्या आणि कार्यक्रमाला निमंत्रीतही साऱ्या स्त्रियाच होत्या.आपल्याकडे निदान महाराष्ट्रीयन लोकांमध्ये माणसांना "सांजीच्या" कार्यक्रमात फारसं सहभागी करून घेतलं जात नाही.असं सगळं असताना सांजीच्या गाण्यांत स्त्री जन्माचा पुसटसाही उल्लेख नाही, जल्लोष नाही....इतका का स्त्रीजन्म भयंकर असतो, वाईट असतो किंवा बेदखल असतो? की कोणालाही त्याचं स्वागत करावंसं वाटत नाही? स्त्रियाच स्त्रियांशी का अशा वागतात? स्त्री जन्माचा आदर करत नाहीत? पूर्वी स्त्रियांना फार हालअपेष्टा सोसाव्या लागत,त्यांना फारसं स्वातंत्र्य नव्हतं.आज काळ बराच बदलला आहे.तुम्ही,मी खूप चांगल्या पद्धतीने जगतो आहोत. पूर्ण जरी स्वतःचे निर्णय घेत नसलो तरी छोटे छोटे निर्णय घ्यायला शिकलो आहोत.बऱ्यापैकी आर्थिक स्वातंत्र्यही आहे. असं सगळं सकारात्मक वातावरण असतांना का आम्ही स्त्री जन्म नाकारतो आहे?

या उलट मी बरेच पुरुष दुसरीही मुलगी झाली हे फार पॉझीटीव्हली स्विकारतांना पाहिले आहे. दुसरी मुलगी स्विकारणं जड जाते त्या बाळीच्या आईला,आजीला...
सख्यांनो, पूर्ण गाण्यात नाही,पण निदान अर्ध्या गाण्यात तरी सीता,राधाच्या नावाचा म्हणजे मुलीच्या जन्माचा उल्लेख असावा असं तुम्हाला नाही वाटत? वाटते नं? मग जेव्हा सांजीच्या, सातव्या महिन्याच्या पाळण्याला जाल तेव्हा गाणी म्हणणाऱ्या स्त्रियांना सांगा तसं.बदल आपोआप होत नाही, तो करावा लागतो. आपण सुरुवात करु या स्त्री जन्माला आदर देण्याची....

* भावना पवार

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

शुभ-अशुभ

नववा "ब"

गुरुजी